Omar Abdullah : “जम्मू काश्मीर सरकार पाडण्याचा भाजपचा डाव”; ओमर अब्दुल्ला यांनी केले गंभीर आरोप
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

Omar Abdullah – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे आमदार फोडून आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हजरतबाल येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. भाजपकडून आमच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष फोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पैशांचा आणि मंत्रिपदाचा लोभ दाखवूनही जेव्हा काही फरक पडला नाही, तेव्हा आता भाजप बंद दाराआड माझ्या आमदारांना सांगत आहे की, आमच्यासोबत या, आम्ही जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ, असा दावा अब्दुल्ला यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या जम्मूच्या एका आमदाराने मला सांगितले की, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने, जो सर्वोच्च न्यायालयाचा वकील देखील आहे.
त्याला भाजपला पाठिंबा देण्यासाठी २० ते ३० कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा देण्याची ऑफर दिली. लोकांची निष्ठा इतकी कमकुवत आहे, असे या लोकांना वाटते, असा टोला त्यांनी लगावला.
नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, व्यासपीठावर बसलेल्या आमच्या आमदारांपैकी एकही लोकप्रतिनिधी असा नाही, जो आपली निष्ठा २० कोटी किंवा अगदी १०० कोटी रुपयांसाठी विकेल.
कारण आम्हाला हे ठाऊक आहे की, आम्हाला देवाला उत्तर द्यायचे आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा कोणताही आमदार स्वतःची फसवणूक करणार नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या दाराने सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आम्ही इतके कमकुवत आहोत असे समजू नका. जनतेने तुम्हाला विरोधी बाकांवर बसवले आहे आणि तुम्ही तिथेच राहणार आहात.
मागच्या दाराने येऊन तुम्ही कधीही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकणार नाही, अशा घणाघाती शब्दांत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.




