नारायणगाव -राज्यात महाविकास आघाडीचे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आल्याने भारतीय जनता पक्षाला संधी वाढली आहे. जसा तुमचा (आशा बुचके) शिवसेनेत काम करताना श्वास कोंडत होता, तसाच आमचाही युतीत असताना काही ठिकाणी श्वास कोंडत होता.
आता राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आता श्वास त्यांचा कोंडतोय. या अगोदर भाजप व शिवसेना युती होती तेव्हा पक्षवाढीसाठी काही मर्यादा होत्या; पण आता मोकळा श्वास घेतोय. आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांचा आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आशा बुचके आधी शिवसेनेत होत्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली.
त्या प्रकारामुळे चिडलेल्या आशा बुचके यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. फडणवीस म्हणाले की, विधानसभेच्या तीन निवडणुका आशा बुचके लढल्या; परंतु दुर्दैवाने तीनही वेळी घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत.
आता आम्हाला 100 टक्के विश्वास आहे की, 2024मध्ये जुन्नरचा आमदार भारतीय जनता पक्षाचा असेल आणि त्या आशा बुचकेच असतील, असा ठाम विश्वास आहे. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सुनील कर्जतकर, हाजी आराफत शेख यांच्यासह बुचके यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव घोषित केले. उमेदवारीची घोषणा आम्ही तेव्हाच घोषित करतो ज्यावेळी त्याला विजयासाठी बळ द्यायचे असते.
गेली अनेक दिवस आम्ही आशा बुचके यांच्या या प्रवेशाची प्रतिक्षा करत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतानाही बुचके या आपल्या मूळ गावी म्हणजे जुन्नर तालुक्यात गेल्या. तिथे 4 वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
आशा बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. भारतीय जनता पक्षात त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय तसेच सन्मानही दिला जाईल. जुन्नरमधून तीनदा आमदारकीची निवडणूक लढवली. पण त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आमदार झालेले बघायचं आहे.
शरद सोनवणे यांनी दगा दिला
आशा बुचके यांनी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन केल्यास राज्यातील व केंद्रातील प्रमुख नेते उपस्थित राहून त्यांना बळ देऊ. असेच बळ शरद सोनवणे यांच्यामागे आम्ही उभे करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी भाजपपेक्षा शिवसेनेबरोबर जाणे पसंत केले व दगा दिला. त्यावेळी आम्ही आशाताईंच्या मागे उभे राहिलो असतो तर त्या केव्हाच आमदार झाल्या असत्या, असे चंद्रकात पाटील म्हणाले.
आगामी काळात जुन्नर तालुक्यात केंद्र सरकारच्या योजना, केंद्राचा निधी व सरकार आल्यानंतर सरकार म्हणून मदत आशाताईंच्या मागे उभी करणार आहोत. पूर्ण जुन्नर विधानसभा संघातील संघटनात्मक निर्णय, सर्व निवडणुकांचे निर्णय, पंचायत समितीचे सदस्य कोण उभे करायचे हे सगळे त्यांच्या सल्ल्याने ठरवणार आहोत. जुन्नर तालुका म्हणजे आशाताई अशी स्थिती आणू.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप