भाजपचे महाराष्ट्रात मिशन ‘युवा’; 12 जानेवारीला शिर्डीत अधिवेशन, अमित शहा, जे.पी. नड्डा उपस्थित राहणार

BJP Convention in Shirdi – विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात जास्तीत जास्त युवकांना पक्षासोबत जोडण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपच्या वतीने 12 जानेवारी रोजी शिर्डी येथे हे अधिवेशन होणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या बैठकीला राज्यभरातून 10 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
‘स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. 12 जानेवारी 2025 रोजी शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन होणार आहे, या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. हा कार्यक्रम भाजपच्या आगामी योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामध्ये तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, असे बावणकुळेंनी यावेळी म्हटले आहे.





