‘भाजपचा ४०० पार चा नारा बकवास…’ – मल्लिकार्जुन खर्गे

चंदिगढ – यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार आहेत. तर, कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वाढणार आहेत. त्यामुळे भाजपचा ४०० पार चा नारा म्हणजे केवळ बकवास आहे.
२०० जागांचा पल्ला ओलांडणेही अवघड होऊन तो पक्ष केंद्रात सरकार स्थापन करू शकणार नाही, असा छातीठोक दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी केला.
अमृतसरमध्ये पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी राज्याराज्यांची समीकरणे मांडली. तसेच, भाजप कुठल्या आधारावर अधिक जागा मिळवण्याचा नारा देत आहे, असा सवाल केला. तामीळनाडू, केरळ आणि तेलंगणा या राज्यांत भाजपचे अस्तित्व नाही.
कर्नाटकमध्ये तो पक्ष तितकासा मजबूत नाही. महाराष्ट्रात भाजप दुबळा बनला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात तगडी लढत होईल. अशा स्थितीत तो पक्ष ४०० जागा कशा मिळवणार, अशी विचारणा त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होईल. त्यानंतर खर्गे त्यांची नोकरी गमावतील, अशी खिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उडवली होती. त्यावरून खर्गे यांनी जोरदार पलटवार केला.
कुठली नोकरी करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय झालो नाही. जनतेची सेवा करण्याच्या उद्देशातून अगदी कमी वयापासून मी कार्यरत आहे. माझा कार्यकाळ जवळपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाइतका आहे.
मी नव्हे; तर शहांनीच ४ जूननंतर स्वत:च्या नोकरीचा विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. संबंधित तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.





