BJP: शहराच्या विद्रूपीकरणात भाजप पदाधिकारी अव्वल
BJP:

भाऊ फ्लेक्स काढा मोहिमेच्या पाहणीत स्पष्ट
BJP: शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सविरोधात पुणे महापालिकेने सुरू केलेल्या भाऊ फ्लेक्स काढा मोहिमेत भाजपचेच पदाधिकारी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी ७०० हून अधिक तक्रारी नोंदवल्या असून, त्यामध्ये सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या फ्लेक्सची संख्या अधिक आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या फ्लेक्सची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांना उपरोधिकपणे काढलेल्या शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६ मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसादिवशीच भिमाले यांना पुरस्कार मिळाला आहे.
वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत आणि सत्काराच्या नावाखाली शहरातील चौक, रस्ते, पदपथ, झाडे आणि सार्वजनिक ठिकाणी सर्रास फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यातून नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने फ्लेक्सचे छायाचित्र अपलोड करून ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा सुरू केली आहे.
या मोहिमेत दुसऱ्या क्रमांकावर कोथरूडमधील भाजप नगरसेवक पृथ्वीराज सुतार असून, त्यांचेही विविध चौकांमध्ये फ्लेक्स आढळले आहेत. तर गल्लीबोळांमध्ये फ्लेक्स लावण्याच्या यादीत नगरसेवक सुनील पांडे यांचे नाव चर्चेत आहे. भिमाले, सुतार आणि पांडे यांना अनुक्रमे साहेब, दादा आणि भाऊ अशी उपरोधिक बिरुदे देत शहर विद्रूपीकरण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
व्यावसायिकांचीही भर
राजकीय पदाधिकाऱ्यांसह व्यावसायिक जाहिरातदारांनीही शहर विद्रूपीकरणात भर घातली आहे. ब्रँड्सच्या गटात ब्रह्मप्रिया वर्ल्ड स्कूलला प्रथम, आर. जी. बिर्याणी स्टोरीला द्वितीय, तर शांती शिखरला तृतीय क्रमांक मिळाला आहे. भिंतींवरही अनधिकृत जाहिराती केल्याचे समोर आले आहे.





