pune: शहरात सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
pune:

न्यायालयाजवळ गोळीबार झाल्याने वकील नाराज; पक्षकारांत भीतीचे वातावरण
pune: एका महिन्याच्या आत दोनदा शिवाजीनगर न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे आलेले ई-मेल, त्यानंतर आज (दि. २५) भरदुपारी न्यायालयाजवळ कोयत्याने वार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
वकील नाराज आहेत, तर पक्षकारांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांना न्याय देणाऱ्या न्यायालय आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतातरी येथील सुरक्षा व्यवस्था कडक होणार का, आणखी एखाद्या घटनेची वाट पोलीस आणि राज्य शासन पाहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर न्यायालयात दररोज हजारो खटल्यांची सुनावणी होते. यामध्ये फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक, मोटार अपघात न्यायाधिकरणासह विविध दाव्यांचा समावेश आहे. यासाठी पोलीस, वकील आणि पक्षकार मिळून दररोज १० ते १५ हजार लोक न्यायालयात येतात.
येथे मोक्कासह खून, खुनाचा प्रयत्न यांसह अनेक गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी न्यायालयाच्या आवारातही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर न्यायालय आवारासह परिसरात चोख बंदोबस्त लावण्याची मागणी पक्षकारांसह वकिलांकडून होत आहे.
ॲड. सम्राट जांभुळकर (सचिव, पुणे बार असोसिएशन) – न्यायालयाजवळ गोळीबारासारखी गंभीर घटना घडणे दुर्दैवी आहे. या परिस्थितीत सुरक्षिततेसाठी अधिक पोलीस फौजफाटा देण्यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. न्यायालयात जाता- येता सक्तीची तपासणी करण्यात यावी. सीसीटीव्ही व्यवस्थित सुधारित करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
ॲड. हेमंत भांड पाटील (प्रसिद्ध वकील) – न्यायालयाच्या तीनही प्रवेशद्वाराजावळ सक्षम सुरक्षा व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पुणे मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी सुरक्षा भिंत बांधली पाहिजे, तसेच न्यायालयीन स्वतंत्र सुरक्षा प्रणाली लागू केली पाहिजे. याबाबतची मागणी पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे.
ॲड. निलेश वाघमोडे (फौजदारी वकील) – न्यायालयाजवळ झालेली ही घटना अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे पक्षकारांसह वकील वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण होते. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे आणि सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झाला पाहिजे. यासाठी न्यायालय परिसर हा न्याय आणि सुरक्षिततेचा परिसर असला पाहिजे.





