पुणे जिल्हा | दौंडमध्ये भाजपा कार्यकर्ते रिचार्ज, तर विरोधी गटात अस्वस्थता

पारगाव, (वार्ताहर) – विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, दौंडचे आमदार राहुल कुल यांचे पहिल्याच यादीत नाव आले असल्याने गावोगावी नियोजनाच्या बैठका होऊन कुल यांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून निवडणुकीच्या कामालाही लागले आहेत; मात्र विरोधी गटात उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडल्याने विरोधी गटात अस्वस्थता पसरलेली दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडे या गटाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, डॉ. भरत खळदकर, डॉ. वंदना मोहिते यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तर माजी आमदार रमेश थोरात यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तुतारी चिन्ह हाती घेण्याचे ठरविले असून पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यांच्याशी बैठकाही झाल्या आहेत.
खरे पाहता ज्या वेळेस इंदापूर चे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना ज्या वेळेस उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस दौंड ची ही उमेदवारी जाहीर झाली असती तर आता पर्यंत खर्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण तयार झाले असते.
परंतु उमेदवारी भरण्याचे काही दिवस शिल्लक राहिले असून सुद्धा अजून उमेदवारी फायनल झालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे. दुसरीकडे शरदचंद्रजी पवार गटाची दौंड ची उमेदवारी अद्याप नक्की झाली नसल्याने शरद पवार यांच्या मनात या दोन्ही अप्पां व्यतिरिक्त तिसर्याच कोणी नसेल ना असे हि मत काही जाणकारांच्या मते व्यक्त होत आहे.
दोन्ही अप्पा वेटिंगवर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार व माजी आमदार रमेश थोरात या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेली तीन चार दिवस झाले दोन्ही अप्पांचे कार्यकर्ते आमचीच उमेदवारी फायनल झाली असून उद्याच ए. बी. फॉर्म आम्हाला मिळणार असल्याच्या पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत.
तर उमेदवारी आम्हा पाच (निष्ठावान) पैकीच मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचे एका उमेदवाराने सांगितले आहे. परंतु या पदाचे दावेदार असणारे एक अप्पा व तालुक्यात स्वतःचा एक गट व नेहमीचे प्रतिस्पर्धी असणारे दुसरे अप्पा. हे दोन्ही अप्पां अद्याप गॅसवर असल्याने कार्यकर्त्यांना नक्की काय सांगावे, याची फार मोठी नामुष्की त्यांच्यावर व प्रमुख कार्यकर्ते यांचेवर येत आहे.





