पुणे जिल्हा | पाटेंना मविआने उमेदवारी द्यावी

नारायणगाव, (वार्ताहर) – नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नारायणगाव व परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 16) मोफत आरोग्य तपासणी शिबिर नियोजनाच्या बैठकीत केली.
यावेळी सरपंच शुभदा वाव्हळ, विद्यमान उपसरपंच व प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, येडगावचे उपसरपंच हर्षल गावडे, खोडदचे माजी सरपंच विजय गायकवाड, मांजरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष संदीप मुळे,
अॅड. राजेंद्र कोल्हे, गुंजाळवाडी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किरण सोलाट, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष दांगट, विकास तोडकरी, आरीफ आतार, अजित वाजगे, भागेश्वर डेरे, अनिल दिवटे, जालिंदर खैरे, विवेक चव्हाण, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कै. अनिल खैरे यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठान व बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मंगळवारी (दि. 23) नारायणगावात मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 2 हजारपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 225 रुग्णांवर वेगवेगळ्या रोगांशी संबंधित मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तर 800 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
निवडणुकीचा निर्णय गाव बैठकीत होणार
योगेश पाटे यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय रविवारी (दि. 21) आयोजित केलेल्या गाव बैठकीत होणार आहे. बाबूभाऊ पाटे यांच्यासारख्या समाजप्रेमी युवकाने जुन्नर विधानसभा लढवावी, अशी गळ उपस्थित कार्यकर्ते, ग्रामस्थ व शिवप्रेमींनी घातली आहे. कार्यकर्त्यांचा रेटा बघून नारायणगाव, वारुळवाडी व परिसरातील ग्रामस्थांची आयोजित गाव बैठकीत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पाटे यांनी दिले
म्हणून प्रबळ दावेदार
नारायणगाव-वारुळवाडी जिल्हा परिषद गटात जवळपास 30 ते 35 हजार मतदार आहेत. या मतदारांवर बाबू पाटे यांची चांगली पकड आहे. पाटे जिल्हा परिषद गटाचे प्रबळ दावेदार असून मागील विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आशा बुचके यांना खंबीर साथ देऊन 50 हजार मतांची आघाडी देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गाव बैठकीत पाटे यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास जुन्नर विधानसभा महाविकास आघाडीतून लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. असे झाल्यास जुन्नर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.





