पुणे जिल्हा | जनतेला येईना नेत्यांचा अंदाज ; अचानक होणार्या बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – विधानसभेची निवडणूक काही महिन्यावरच येऊन ठेपले आहे त्यामुळे राज्यभर, राजकीय पक्षातील फोडाफोडी, पक्षप्रवेश, घोषणा यामुळे राज्य चर्चेत राहिले आहे. यामध्ये इंदापूर तालुका देखील कमी पडत नाही. पालखी सोहळ्यात चालत असताना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कार्यकर्त्यांनी वाजवा तुतारी म्हणून आग्रह केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या एका तालुका पदाधिकार्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांचा बॅनरवर फोटो टाकून विधानसभेच्या चर्चेचा मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यातच भर म्हणून वरिष्ठ भाजप नेत्यांचे बॅनरवरील फोटो अचानक गायब झाल्याने इंदापूर तालुक्यात चर्चा उलट सुलट बाजूने सुरू आहे. त्यामुळेच जनतेला आपल्या नेत्यांचा अंदाज अद्यापि तरी लागलेला नाही.
इंदापूर हा तसे पाहिले तर बागायती तालुका आहे. राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत देखील राहिलेला आहे. दिवंगत नेते कर्मयोगी शंकरराव पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मंत्रिपद सांभाळले.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील आपल्या दोन टर्ममध्ये इंदापूर तालुक्याला विकास काय असतो हे दाखवून दिले. हे खरे असले तरी देखील इंदापूर तालुक्यात राजकीय जादू करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या नावाचे सूत्र इंदापूर तालुका कधी विसरू शकत नाही.
बारामती तालुक्यात जेवढा राजकीय सामाजिक टच शरद पवारांचा आहे. त्यापेक्षा अधिक जवळीक शरद पवारांनी इंदापूर तालुक्यातील गावागावात ठेवलेली आहे. याचीच उतराई म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेत इंदापूर तालुक्यातून भरभरून मतदान मिळाले. विधानसभेचे पडघम वाजल्यापासून इंदापूर तालुक्यातून कोण तुतारी हातात घेणार, याची मात्र रस्सीखेच लागताना दिसत आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी लोकसभा निवडणूक कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर आप्पासाहेब जगदाळे विधानसभेला उमेदवार असतील हे निश्चित बोलले जात होते.
खासदार सुप्रिया सुळे यांना अपेक्षेपेक्षाही जादा मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळाले व शरद पवारांची आकर्षकता त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अधिक वाढली. त्यामुळे जेवढे म्हणून विधानसभेला इच्छुक आहेत. त्या नेत्याला त्यांचे कार्यकर्ते तुतारीकडे चला म्हणून गळ घालत आहेत.
कोण वाजवणार तुतारी?
हा नेता यंदा तुतारी वाजवणार, तो तुतारीत प्रवेश करणार, पवार साहेबांना, सुप्रियाताईंना हा भेटला, तो भेटला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. अशा राजकीय वावड्या मात्र रोजच जनतेला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने आपला नेता कोणाकडे जाणार, कोणत्या पक्षाकडून उभा राहणार. याची काळजी निष्ठावान कार्यकर्त्यांना लागलेली आहे. असे असले तरी जनता जनार्दन ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचे आहे. त्यालाच देतील हे मात्र नक्की.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी इंदापूर तालुक्यातील गावागावात तयारी सुरू केली आहे.
इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे व बहुतेक सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी गारटकर यांना आमदारकीची संधी मिळाली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तशा आशयाचा इंदापुरात बॅनर देखील झळकला. त्यामुळे आणखी काही गुंता वाढणार का, अशीही चर्चा रंगू लागली आहे.





