BJP Wins Muslim Seats: “काबा-काली-बाबरीवर भाजपचा आवाज, तरी ४५% मुस्लिम जागा कशा जिंकल्या?” ; बंगालमध्ये मोदी-शाहांचा धक्कादायक ‘खेला’
BJP Wins Muslim Seats: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सर्व राजकीय विश्लेषकांना चकित केले आहे. २९४ जागांच्या विधानसभेत २०६ जागा जिंकून भाजपने राज्याच्या १५ वर्षांच्या राजकीय इतिहासात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

BJP Wins Muslim Seats: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सर्व राजकीय विश्लेषकांना चकित केले आहे. २९४ जागांच्या विधानसभेत २०६ जागा जिंकून भाजपने राज्याच्या १५ वर्षांच्या राजकीय इतिहासात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.
मात्र, एकेकाळी ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बंगालच्या ११५ मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये पक्षाने त्याहूनही मोठा चमत्कार घडवला आहे. या मतदारसंघांमध्ये, जिथे मुस्लिम मतदार ३० टक्के किंवा त्याहून अधिक आहेत, त्याठिकणी आपली पारंपरिक मतपेढी नसतानाही भाजपने ३९ जागा जिंकल्या. हे कसे शक्य झाले? जाणून घेऊ काही महत्वाचे मुद्दे…
१ . टीएमसीच्या ‘अभेद्य’ मुस्लिम मतपेढीचे झालेले विभाजन (BJP Wins Muslim Seats)
ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गेल्या दीड दशकापासून मुस्लिम मतपेढीवर मक्तेदारी गाजवली होती. २०२१ मध्ये, टीएमसीने ४४ पैकी ४३ मुस्लिमबहुल जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी टीएमसीची मतपेढी काँग्रेस, डावे आणि हुमायून कबीर यांच्या नव्या पक्ष, आम जनता उन्नयन पार्टी (एजेयूपी) यांच्यात विभागली गेली होती.
मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यांतील ४३ जागांपैकी, भाजपने २०२१ मध्ये केवळ ८ जागा जिंकल्या होत्या, तर २०२६ मध्ये हा आकडा १९ पर्यंत वाढला. या उलटफेराचे सर्वात मोठे कारण भाजपकडे त्यांचा असलेला कल नव्हे तर मुस्लिम मतांचे विभाजन होते.
उदाहरण द्यायचे झाले तर मुर्शिदाबादच्या राणीनगरमध्ये काँग्रेसने ७९,४२३ मतांनी विजय मिळवला, तर टीएमसी (७६,७२२) आणि डावे (४८,५८७) यांच्यातील मतांच्या विभाजनामुळे भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा झाला.
काबा-काली आणि बाबरी मशीद या ‘ज्वलंत’ मुद्द्यांचा दुहेरी वापर
भाजपने आपल्या निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून बंगालच्या सांस्कृतिक ओळखीचा फायदा उचलला. टीएमसी खासदार सायनी घोष यांचा ‘मेरे दिल में है काबा’ हे गाणे गातानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, भाजप नेत्यांनी याला ‘काली विरुद्ध काबा’ असे स्वरूप दिले.
अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी असा समज निर्माण केला की, बंगालच्या आत्म्यात केवळ देवी काली आणि दुर्गा वास करतात. दुसरीकडे, भाजपने ‘जय श्री राम’ ऐवजी ‘जय मा काली’ ही घोषणा स्वीकारून बंगाली अस्मितेशी थेट संबंध जोडला.
बाबरी मशीद वादामुळे मुस्लिम मतपेढीत फूट पडली. निलंबित टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये दुसरी बाबरी मशीद बांधण्याची योजना जाहीर केली आणि एजेयूपी (AJUP) नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला.
भाजपने या मुद्द्याला ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ संबोधून हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर केला. गृहमंत्री अमित शाह यांनी, “आम्ही बंगालमध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही.” असे स्पष्टपणे सांगितले.
कबीर यांच्या पक्षाने टीएमसीच्या मुस्लिम मतपेढीला धक्का पोहोचवला. परिणामी, कबीर यांनी स्वतः रेजीनगर आणि नाओडा जागा जिंकून टीएमसीला मोठा धक्का दिला. भाजपला मुस्लिम मते मिळाली नसली तरी, या विभाजनामुळे टीएमसीच्या विजयात मोठा अडथळा निर्माण झाला.
SIR चा ‘गुप्त’ परिणाम अन् ९१ लाख मतदारांचा खेळ
निवडणुकीपूर्वी, निवडणूक आयोगाने विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) अंतर्गत अंदाजे ९१ लाख मतदारांची नावे यादीतून काढून टाकली, ज्यामुळे एकूण मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरून ६.७५ कोटी झाली.
याचा सर्वाधिक परिणाम मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या अल्पसंख्याक-बहुल जिल्ह्यांमध्ये झाला. तज्ज्ञांच्या मते, एसआयआरमुळे मुस्लिम मतदारांना टीएमसीला एकजुटीने मतदान करण्याऐवजी इतर पक्षांकडे वळण्यास भाग पडले.
‘शून्य’ मुस्लिम उमेदवार, पण सर्वत्र विजय ( BJP Wins Muslim Seats)
भाजपने २०२१ मध्ये आठ मुस्लिम उमेदवार उभे केले होते, पण कोणीही जिंकले नाही. यावेळी, पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही आणि पूर्णपणे हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करण्यावर अवलंबून राहिले. हा अंदाज अचूक ठरला.
टीएमसी केवळ ३० मुस्लिमबहुल जागांवर आघाडीवर होती आणि १२ जागांवर मागे होती. भाजपने असा संदेश दिला की, ‘मते विकासाने मिळतात, विशिष्ट समुदायाने नव्हे.’
भाजपच्या या ऐतिहासिक विजयाचे सूत्र स्पष्ट आहे. भाजपने ४५% मुस्लिमबहुल जागा जिंकल्या, कारण मुस्लिम मते तीन-चार पक्षांमध्ये विभागली गेली होती, तर हिंदू मतांनी एकजुटीने भाजपला पाठिंबा दिला. टीएमसीचा मतांचा वाटा ४०.८०% असताना, भाजपचा मतांचा वाटा केवळ ५% जास्त (४५.६४%) असूनही, त्यांना जागांमध्ये लक्षणीय आघाडी मिळाली.






