West Bengal Result: पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक उलथापालत पाहायला मिळाली. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) दारुण पराभव करत भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या हक्काच्या भवानीपूर मतदारसंघातून भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी 15105 मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. दरम्यान अनेक फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी या आघाडीवर होत्या. २९४ सदस्यांच्या विधानसभेत भाजपने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये पराभूत झाल्यानंतर ममतांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र २०२६ च्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा ‘जायंट किलर’ ठरत त्यांचा पराभव केला. २०२१ मध्ये ७७ जागांवर अडकलेल्या भाजपने यावेळेस थेट २०० पार मजल मारली आहे. ‘बंगाल भीतीमुक्त झाला’ – पंतप्रधान मोदी विजयानंतर संध्याकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज बंगाल खऱ्या अर्थाने भीतीमुक्त झाला असून आता विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करेल.” भाजपने या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेने बदलासाठी दिलेल्या कौलाला दिले आहे. ममता बॅनर्जींचे ‘लूट’चे आरोप – दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून त्यांचा आकडा दोन अंकी संख्येपर्यंत मर्यादित राहिला आहे. या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत “जागांची लूट” झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत सुमारे ९० लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. २०२१ विरुद्ध २०२६: सत्तेचे समीकरण बदलले- २०२१ चा निकाल: तृणमूल २१५ जागा, भाजप ७७ जागा, काँग्रेस आणि डावे शून्य. २०२६ चे चित्र: भाजप २००+ जागा, तृणमूल काँग्रेस दोन अंकी संख्या, सत्तांतर निश्चित.