Ramesh Bidhuri : दिल्लीत भाजप पन्नाशी गाठणार ! रमेश बिधुरी यांचा दावा

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत बनत चालली आहे. त्यातून भाजप जागांची पन्नाशी गाठेल, असा दावा करत ज्येष्ठ नेते रमेश बिधुरी यांनी पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. दिल्लीत सत्तारूढ आपची राजकीय पीछेहाट सुरू झाली आहे.
त्याउलट, भाजपला अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यामुळे भाजप एकूण ७० पैकी ४६ ते ५२ जागा जिंकेल, असे भाकित बिधुरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले. भाजपच्या प्रमुख उमेदवारांमध्ये बिधुरी यांचा समावेश आहे. ते मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांच्या विरोधात कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अपघाताने बनलेल्या मुख्यमंत्री अशा शब्दांत आतिशी यांच्यावर निशाणा साधला.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी ठेवल्या. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले. त्यानंतर आतिशी यांना अपरिहार्यतेतून मुख्यमंत्री बनवण्यात आले, असा दावाही त्यांनी केला.
दिल्लीत भाजपने बाजी मारल्यास मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बिधुरी हेही असतील अशा चर्चा रंगत आहेत. त्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना बिधुरी यांनी कुठल्याही पदाची आकांक्षा नसल्याचे म्हटले. पक्षाने मला खूप काही दिले. भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल ते पक्षाचे संसदीय मंडळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.





