BJP will issue notice to MP : भाजप नितीन गडकरींसह ‘या’ 20 खासदारांना बजावणार नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले. या अगोदर भाजपने अनेक खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र तरीदेखील आज लोकसभेत भाजपचे 20 खासदार गैरहजर होते. यामध्ये काही केंद्रीय मंत्रीदेखील आहेत. आता पक्ष या गैरहजर राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. त्यानंतर त्यांचे उत्तर आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
‘हे’ खासदार होते गैरहजर
भाजपने सोमवारीच आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप काढला होता. त्यानंतर भाजपचे अनेक खासदार उपस्थित नव्हते. त्यामध्ये केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत. गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नितिन गडकरी शांतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी वाई राघवेंद्र, गिरिराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, विजय बघेल, उदयराज भोंसले, भागीरथ चौधरी, जगन्नाथ सरकार आणि जयंत कुमार रॉय यांचा समावेश आहे.
भाजप पाठवणार नोटीस
भाजपकडून गैरहजर राहिलेल्या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. पक्षाचा व्हीप असताना एखादा खासदार गैरहजर राहिल्यास त्याला त्याचे कारण द्यावे लागते. ते कारण योग्य असेल तर पक्षाकडून त्या खासदारावर कारवाई केली जात नाही मात्र कारण अयोग्य असेल तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते. तसेच त्या खासदाराचे सदस्यत्व सुद्धा रद्द होते.





