पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला, तसेच मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुणेकरांमध्येच प्रचंड उत्साह आहे. पुणेकरांनीच ठरवले असल्यामुळे मोहोळ यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आहे, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज भरण्यापूर्वी पक्षाकडून कोथरूड ते डेक्कनपर्यंत पदयात्रा काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. धोंडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडुजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला. दरम्यान, ठिकठिकाणी पदयात्रेचे फुलांचा वर्षाव आणि भव्य पुष्पहाराच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. या मार्गावर अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पुणेरी पाट्या घेऊन मतदानाचा संदेश देत होते. आई- वडिलांचे आशीर्वाद घेऊन प्रारंभ… तत्पूर्वी मोहोळ यांनी आई- वडिलांचे आशीर्वाद घेतले व ग्रामदेवता कसबा गणपतीला वंदन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कसब्यातील जनसंपर्क कार्यालयात असलेल्या प्रतिमेसही अभिवादन केले. पुणेकरांनीच ठरवले असल्याने पुण्यात मोहोळ यांचा सहज विजय होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अनेक योजना पुण्यात राबवल्या आहेत. भविष्यातही त्यांची दूरदृष्टी पुणेकरांना एक चांगला खासदार निवडल्याची अनुभूती देईल, अशी खात्री वाटते. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री