हरियाणात भाजपाला बसणार धक्का; गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर?

Kanhiya Mittal | हरियाणा विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुप्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे कन्हैया मित्तलने यांनी सांगितले आहे. हरियाणाच्या पंचकुला मतदारसंघातून कन्हैया मित्तल यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती, मात्र भाजपने जुने नेते ज्ञानचंद यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कन्हैया मित्तल भाजपवर नाराज असल्याची चर्चा होत आहे.
जो राम को लाए हैं… गाणं प्रसिध्द
2022 मध्ये झालेल्या यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान कन्हैयाचे ‘जो राम को लाए हैं, हम उनको लायेंगे’ हे गाणं खूप प्रसिद्ध झाले. यानंतर कन्हैया मित्तलने मुख्यमंत्री योगी यांचीही भेट घेतली आणि त्यांनी सार्वजनिक मंचावरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. एवढेच नाही तर गेल्या वर्षी त्यांनी ‘मैं यूपी बोल रहा हूँ’ हे गाणे गायले होते, ज्यामध्ये योगी सरकारच्या कामांचे कौतुक केले होते.
एका मुलाखतीदरम्यान कन्हैया मित्तल यांना तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी आहे का? असे विचारण्यात आले. यावर कन्हैया मित्तल म्हणाला की, “कोणतीही नाराजी नाही, पण माझे मन काँग्रेसशी जोडले जात आहे. मी यापूर्वी कधीही कोणत्याही पक्षासाठी काम केले नाही. परंतु, मला वाटते की मी काँग्रेसमध्ये जावे.”
यावेळी मित्तल यांना काँग्रेसनेही रामाला येण्यापासून रोखल्याचे तुम्ही म्हणाले होते, तरीही तुम्ही हा निर्णय कसा घेत आहात? असा सवाल केला. यावर कन्हैया मित्तल म्हणाला, “मी असं म्हटलं नाही, उलट मी म्हटलं की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राम मंदिराचा निर्णय घेतला असता, तर मी त्यांच्यासाठीही गाणं गायलं असतं. मात्र, आता जाणवतंय आपण काँग्रेससोबत जायला हवं. येणाऱ्या तरुणांनीही हे समजून घेतले पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही राम मानतो, पण असे नाही की, सगळे राम विरोधी काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसमध्येही रामावर प्रेम करणारे लोक आहेत आणि सनातनी लोकही आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम केले जाऊ शकते.” दरम्यान, कन्हैया मित्तलने अलीकडेच बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.





