भाजपचा पराभव होणार ! कॉंग्रेस नेते कमलनाथ यांचा दावा

भोपाळ – अबकी बार ४०० पार या भारतीय जनता पार्टीच्या घोषणेवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की भाजपची गॅरंटी एक्स्पायरी डेटची आहे. कोणीही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे यावेळी भाजपला पराभूत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये कमलनाथ म्हणाले की भारतीय जनता पार्टी जगातला असा एकमेव पक्ष आहे की तो ज्याची गॅरंटी देतो तीच बाब नंतर अमान्य करत यूटर्न घेतो. त्यामुळे सगळ्यांनी आपले डोके वापरावे आणि भाजपला भुलण्याची चूक करू नये.
ते पुढे म्हणाले की भाजपने मध्य प्रदेशातील महिलांना महिन्याला ३ हजार रूपये देण्याचे म्हटले होते. गॅस सिलिंडर साडेचारशे रूपयांत देण्याचा शब्द दिला होता. २७०० क्विंटलने गहु खरेदी करणार असेही त्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांचे ५० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे तेम म्हणाले होते. मात्र आजही त्यांनी यातले काही पूर्ण केले नाही.





