Harshwardhan Sapkal : प्रत्येक बाबतीत जात-धर्म आणणे भाजपचा फंडा; हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्युत्तर
महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. तसेच माध्यमांनी विचारला त्यासंबंधानी मी दिलेल्या उत्तराचा भाजपकडून ध चा मा करण्यात आला. जाती, धर्मावरुन राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा हा जुनाच फंडा आहे.
Harshwardhan Sapkal : महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. तसेच माध्यमांनी विचारला त्यासंबंधानी मी दिलेल्या उत्तराचा भाजपकडून ध चा मा करण्यात आला. जाती, धर्मावरुन राजकारण करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा हा जुनाच फंडा आहे, असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त हिंदू – मुस्लिम असा जाती धर्मांमध्ये भेद करणे एवढेच माहित आहे. भाजप आज जे करत आहे, हा त्यांचा खोडसाळपणा आहे. तसेच राज्यातील अनागोंदी कारभारावरून देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबासोबत केली, तेव्हा ते म्हणाले की मी सपकाळांना ओळखत नाही.
त्यांच्या कारभारावर टीका करताना त्यांना जल्लाद, क्रूर म्हटले. तेव्हा त्यांनी माझ्या वक्तव्याची दखल घेतली नाही. पण आज माझ्या वक्तव्यावर ते आवेषाने बोलू लागले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात जे मुलभूत मुद्दे आहेत आणि दिल्लीत जी फाईल समोर येत आहे, त्यावरुन त्यांना लक्ष विचलीत करायचे आहे, असा टोला त्यांनी लगाविला.
माझ्या वक्तव्याला ते हिंदू – मुस्लिम असा एंगल देऊन त्याला खतपाणी घालत आहेत. माझ्या माफीची मागणी त्यांच्याकडून होत आहे, कारण ते माफीवीराच्या पक्षाचे असल्यामुळे अशी मागणी करत आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान व्यक्त केला होता. टिपू सुलतानबद्दल माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपने नुकत्याच झालेल्या महापालिका, झेडपी निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो वापरले होते.
तुमच्या प्रचारात, बॅनर, पोस्टर, घोषणापत्रात टिपू सुलतानचे फोटो चालतात. आता जी भूमिका भाजपने घेतली आहे, तेव्हा त्यांचा स्वाभीमान कुठे गेला होता, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवाजी महाराजांबद्दल अनेकदा विकृत बोलले, त्यांचे पुतळे भाजप जाळणार आहे का? असा सवाल सपकाळांनी भाजपला केला.






