Ganesh festival 2025 : सत्तेतून बाहेर असणाऱ्या उद्धवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात असणे महत्त्वाचे असताना, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने देखील जोर लावला आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणूकांचे बिगूल वाजणार असल्याने, कोकणातील चाकरमान्यांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी भाजप व उद्धवसेनेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सव व शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी बसेस व रेल्वेच्या आरक्षणाला दोन्ही पक्षांनी जोर लावला आहे. भाजपाने पुढाकार घेताना सुमारे ५०० पेक्षा अधिक बसगाड्या आधीच आरक्षित करुन ठेवल्या असून उद्धवसेनेकडून देखील खासगी बसगाड्या मोठ्या प्रमाणात आरक्षित करण्यात येत आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी बनवणे, बसगाडीत चढण्या-उतरण्याचे ठिकाण निश्चित करणे, एकाच वाडीतील अनेक प्रवासी असल्यास थेट वाडीत गाडी नेण्याची व्यवस्था, बसप्रमुख निश्चित करणे अशी तयारी मुंबई, ठाणे, डोंबिवलीतील पक्षांच्या कार्यालयांमध्ये वेगाने सुरू आहे. यंदा २७ ऑगस्टला गणपतींचे आगमन होणार आहे. त्या आधीचा शनिवार-रविवार हा कोकणवासीयांचा प्रवासवार ठरणार आहे. प्रवासी अर्थात मतदारांच्या कलानुसार २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मुंबई आणि परिसरातील चाकरमानी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षही याच मुहूर्तावर गाड्या चालवण्याचे नियोजन करीत आहेत. नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून, विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे. निवडणुकांच्या धर्तीवर मतदारांना शहर ते कोकण ते शहर असा प्रवास घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि उद्धवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी वांद्रे कुर्ला संकुलातून (बीकेसी) गाड्या चालवण्यात आल्या. यंदा बीकेसीसह अन्य भागांतून गाड्या रवाना करण्यात येतील. संपूर्ण बसची जबाबदारीसाठी बसप्रमुख नियुक्त करण्यात येतो, असे भाजपच्या कोकण विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तयारीत भाजपची आघाडी उत्सवानिमित्त मध्य रेल्वेने २५० विशेष रेल्वेफेऱ्यांची घोषणा केली असून याचे आरक्षण गुरुवार, २४ जुलैपासून सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेने ४४ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली असून याचे आरक्षण बुधवार, २३ जुलैपासून सुरू होणार आहे. एसटी महामंडळाने ५,००० गाड्यांची घोषणा केली असून याचे आरक्षण सुरू झाले आहे. बोरिवली, भांडुप, जोगेश्वरी, गोरेगाव, विक्रोळी, घाटकोपर, दादर, विलेपार्ले अशा भागांतून कोकणात गाड्या धावणार आहेत. ठाणे, डोंबिवली पट्ट्यातूनही प्रवाशांसाठी बस चालवण्याचे नियोजन आहे. एसटी महामंडळातील सेमी लक्झरी (एशियाड), आरामदायी, वातानुकूलित अशा सर्व प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी ५१२ बसगाड्या आणि चार रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या होत्या. यंदाही अधिक गाड्या चालवण्यात येणार आहेत, असे भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.