चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यात भाजपला धक्का; कार्यकर्त्यांनी हाती घेतली ‘तुतारी’! निष्ठावंतांना डावल्याचा केला आरोप

Chandrashekhar Bavkule BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला भाजपमध्ये येण्यास अनेकांची चढोओढ सुरू आहे, असे असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघातील सावरगाव सर्कल बानोर पिठारीचे उपसरपंच शेखर पांडे, नीलेश पांडे, निखील चौधरी यांच्यासह भाजपाच्या अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली हाती तुतारी घेतली आहे. ‘बाहेरच्यांना पायघड्या आणि निष्ठावंताच्या हाती सतरंज्या‘ या भाजपच्या धोरणामुळे कार्यकर्ते दुखावले असल्याचा खोचक टोला सलील देशमुख यांनी लगावला आहे. कटोल विधानसभा क्षेत्रातून सलील देशमुख यांनी अनिल देशमुखांच्या जागी निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुखय यांनी पक्षात सर्वांचे स्वागत केले. भाजपमधील अनेक कार्यकर्ते नाराज असून आगामी काळात ते आमच्या पक्षात दाखल येणार असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. भाजपने विधानासभेच्या निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करु, असे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनांचा विसर सत्तेत येताच पडला आहे, असे देखील ते म्हणाले. अनेक बहिणींची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जात असल्याचा आरोपही सलील देशमुख यांनी केला आहे.
पाच वेळा प्रतिनिधित्व
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाने कटोल-नरखेड हा विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. त्यांनी तब्बल पाच वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्या जागी सलील देशमुख यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले.





