भाजपतर्फे केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू – जयंत पाटील

पारनेर :- भाजप नेते किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीचे नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं ? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारनेर येथे केला.
महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कट-कारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे, असे आवाहन जयंत पाटील यांनी पारनेर येथील राष्ट्रवादी परिवार संवादात केले.
केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही, मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे असे राजकारण सुरू आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे. मात्र बेसुमार महागाई आणि दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. केंद्रसरकार आपल्याला मदत करत नाही हे लक्षात आल्यावर राज्यसरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले हे त्यांनी प्रकर्षाने पारनेरवासियांसमोर मांडले.
पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ…
निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय ? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ ही महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.






