भाजपला जनता कंटाळण्याच्या स्थितीची प्रतीक्षा नको; सचिन पायलट यांचे परखड भाष्य

मुंबई : केंद्रात मागील ११ वर्षांपासून कॉंग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे पक्षाने मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. त्यासाठी जनतेपर्यंत पोहचायला हवे. जनता भाजपला कंटाळेल आणि आपल्याकडे येईल या स्थितीची प्रतीक्षा केली जाऊ नये, असे परखड भाष्य कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी शनिवारी केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पक्ष प्रयत्नशील आहे.
पक्षाकडे विशिष्ट स्वरूपाचा आराखडा तयार आहे. चालू वर्षात पक्ष संघटनेला मजबूत बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे, असे पायलट यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. हरियाणा विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचा पराभव अनपेक्षित असल्याचे म्हणत त्यांनी त्या निकालाचा ठपका अप्रत्यक्षपणे आपवर ठेवला. कॉंग्रेस आणि भाजपला मिळालेल्या मतांमधील फरक अवघा ०.३० टक्का इतका आहे. हरियाणातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय आपने घेतला. त्या पार्श्वभूमीवर, सर्वांसमोर निकाल आहे, असे त्यांनी म्हटले.





