“भाजपने ‘काश्मीर फाईल्स’ची मोफत तिकीटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी मोफत कुपन्सही वाटली पाहिजेत ”

नवी दिल्ली : देशात एका आठवड्यापासून इंधनाचे दर प्रती लिटर पाच रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. दरम्यान, राजस्थानमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी मोदी सरकारकडे एक वेगळीच मागणी केली आहे. “ज्या पद्धतीने भाजपाच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ची तिकीटं वाटली तशीच केंद्र सरकारने इंधनासाठी कुपन्स वाटावीत” अशी मागणी प्रताप यांनी केली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रताप यांनी ही मागणी केली आहे. “निवडणुकांनंतर भाजपाने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. ते राम भक्त नसून रावण भक्त आहेत. त्यांनी पेट्रोल, डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत, ज्याप्रमाणे त्यांच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटं वाटली,” असे वक्तव्य प्रताप यांनी केले आहे.
प्रताप यांनी इंधनदरवाढ आणि सध्या देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’चा संबंध जोडत भाजपावर निशाणा साधला आहे. काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाच्या कथानकावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ची भाजपाच्या अनेक नेत्यांनी स्तुती केली आहे. अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांनी संपूर्ण चित्रपटगृहांचे बुकींग करुन हा चित्रपट मोफत दाखवला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पहावा असं भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी आतापर्यंत बोलून दाखवलंय.
पंतप्रधान मोदींनीही या चित्रपटचं कौतुक केले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मोदींनी, ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा टोला लगावला.
मागच्या आठवड्याभरापासून देशातील इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून इंधानेच दर स्थीर होते. मात्र मार्च महिन्यामध्ये २० तारखेपासून इंधानेच दर दिवसाला सरासरी ८० पैशांनी वाढू लागले. मागील आठ दिवसांमध्ये सात वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.





