हडपसर – भाजपला दिलेले मत म्हणजे देश, राज्य, शहर आणि पर्यायाने आपल्या प्रभागाच्या विकासाला दिलेले मत असल्याने मतदारांनी प्रभाग क्र. १६ मधील आरपीआय-भाजपच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन उमेदवारांनी केले. हडपसर-सातववाडी प्रभाग क्र.१६ मधील भाजप-आरपीआय गटाचे अधिकृत उमेदवार मारुती आबा तुपे, शिल्पा नितीन होले, उज्ज्वला सुभाष जंगले आणि संदीप रामचंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ हनुमान सेवा ट्रस्ट, ओंकार कॉलनी, काळेपडळ येथे पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधण्यात आला. या पदयात्रेत ओंकार तुपे, बाळासाहेब हिंगणे, गणेश फुलारे, कुणाल चौरे, सतीश भिसे, नरेंद्र चव्हाण, सिद्धेश काळे, ओंकार साळुंखे, शुभम मिसाळ, सुरेश बारवकर, संदीप चव्हाण, आकाश तिखे, धोंडप्पा मुलगे, अनिकेत सुर्वे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदारांशी संवाद साधताना उमेदवार मारुती आबा तुपे म्हणाले की, जनतेच्या विश्वासावर उभे राहून प्रत्येक घराशी आपुलकीचे नाते जपणे हेच आमचे राजकारण आहे. अडचणी केवळ ऐकून घेणे नव्हे, तर त्यावर ठोस उपाय करणे हीच आमची ओळख आहे. प्रभाग क्र. १६ च्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही निष्ठेने, पारदर्शकतेने आणि पूर्ण मनापासून काम करू.