“अगोदर भ्रष्टाचार करतात आणि..” बँक खाती गोठवल्याबाबतचे कॉंग्रेसचे आरोप भाजपने फेटाळले

नवी दिल्ली – आयकर विभागाने आमची खाती गोठवली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. तर अर्थात नंतर या विभागाने पुढील सुनावणीपर्यंत खात्यांवरची स्थगिती हटवली आहे. मात्र यानिमित्ताने कॉंग्रेसने भाजपला जोरदार लक्ष्य केले. त्यानंतर भाजपकडूनही कॉंग्रेसला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की कॉंग्रेसचे आरोप बिनबुडाचे आहेत. कॉंग्रेस पक्ष स्वत:ची चांगली व्यवस्था करतो. अगोदर भ्रष्टाचार करतात आणि नंतर त्याचा हिशेबही ते ठेवत नाहीत.
आयकर विभागाची ही नेहमीची प्रक्रिया आहे. १०५ कोटींच्या टॅक्सची मागणी केली गेली आहे. ते त्याच्या विरोधात गेले. यात २० टक्के जमा करावे लागतात. त्यांनी ७८ लाख रूपये जमा केले. अपील करतानाही त्यांनी प्रक्रियेचे पालन केले नाही.
हे आयकर विभागाचे प्रकरण आहे व भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही. जनेतेनेच त्यांना मत न देण्याचे ठरवले असेल तर त्यात आम्ही काय करू शकतो? राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत मात्र त्यांची आघाडी तुटते आहे.





