Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या क्षमतेवर भाजपचे प्रश्नचिन्ह !
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ई २० पेट्रोलविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यावरून भाजपने जोरदार पलटवार करत केजरीवाल यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Arvind Kejriwal – आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ई २० पेट्रोलविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यावरून भाजपने जोरदार पलटवार करत केजरीवाल यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
केंद्र सरकारने जनतेला शुद्ध पेट्रोल आणि ई २० पेट्रोल यांपैकी एक निवडण्याचा पर्याय द्यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी लावून धरली आहे. त्यासाठीच्या याचिका सादर करण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानावर ४ ऑगस्टला मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली.
त्यावर केंद्रीय मंत्री आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी) पदवीधर असल्याचा दावा केजरीवाल करतात.
मात्र, ई २० आणि इतर तंत्रज्ञान विषयक मुद्द्यांवर त्यांनी केलेली वक्तव्ये पाहता ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही (आयटीआय) शिकल्याचे वाटत नाही. खरोखरीच आयआयटीमध्ये शिकले असते; तर केजरीवाल यांनी कधीच इथेनॉल मिश्रित पेट्रोलला ( ई २०) विरोध केला नसता.
ई २० मुळे देशाच्या परकी चलनाची बचत होते. त्याशिवाय, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध होऊ शकते, अशी भूमिका मल्होत्रा यांनी निवेदन जारी करून मांडली.





