BJP Protest: पुण्यात भाजप आक्रमक! काँग्रेस भवनासमोर पोलीस ताफा तैनात…नेमकं काय घडलं?
BJP Protest: राहुल गांधींच्या आंदोलनाविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; बालगंधर्व चौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी सावरकर भवनाजवळच अडवला.

BJP Protest – पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी मोजक्याच सुमारे १५-२० कार्यकर्त्यांच्या उपस्थित काँग्रेसच्या निषेधार्थ सावरकर भवन येथे आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने भवनला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने काँग्रेस भवन येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकातून काँग्रेस भवनकडे आंदोलनासाठी दुपारी ४.१५ वाजता घोषणाबाजी करत वाटचाल सुरू केली. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना सावरकर भवन समोरच रोखले. काँग्रेस भवनपर्यंत पोचू दिले नाही. काँग्रेस भवनातही काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. भाजपच्या आंदोलकांचे गांधीगिरी मार्गाने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठेवली होती.
युवा मोर्चाच्या आंदोलनात पुष्कर तुळजापूरकर, प्रणव गंजीवाले, शिवम बालवडकर, सचिन सुर्वे, सागर शेटे, ऋषिकेश मयेकर आदींनी सहभाग घेत राहुल गांधींच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली. सकाळ पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून काँग्रेस भवनकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.





