BJP Politics : एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! महापौर पदासाठी भाजपकडून नवा फॉर्मुला समोर

BJP Politics : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी लागून आता तीन दिवस उलटले तरी राजकीय वातावरण शांत झालेले नाही. महायुतीच्या विजयानंतर आता महापौरपदांच्या वाटपावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे या दोन प्रमुख महापालिकांमध्ये सत्तावाटपाचा मुद्दा अधिक तापदायक ठरला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे की, ज्या महापालिकांमध्ये त्यांचे नगरसेवक सर्वाधिक आहेत, तिथे महापौरपद शिवसेनेचे (शिंदे गट) असावे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. मुंबईत शिंदे गट अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करत आहे. ही मागणी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाशी जोडून पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावनांना साजेशी ठेवण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिली जात आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर भाजपाने एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिंदेंच्या या आग्रहाला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने ठाणे महानगरपालिकेत थेट आणि आक्रमक दावा सांगितला आहे. ठाण्यात अडीच वर्षांसाठी महापौरपद भाजपाला मिळावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
भाजपाचा डाव
नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या असून, पक्षाला ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे भाजपाला केवळ २८ जागा मिळाल्या आहेत. ठाण्यात एकूण १३१ जागा असल्याने शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत आहे आणि ते सहज महापौर बसवू शकतात.
तरीही भाजपाने ‘महायुतीचा धर्म’ पाळण्याच्या नावाखाली ठाण्यात अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. राजकीय वर्तुळात याला मुंबईत शिंदेंची कोंडी करण्यासाठीचा सुस्पष्ट राजकीय डाव म्हणून पाहिले जात आहे. मुंबईत जास्त दबाव आणण्यासाठी ठाण्यात हा प्रतिहल्ला केला जात असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटासमोर कठीण निर्णय
आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. मुंबईत अडीच वर्षे महापौरपद मिळवायचे असेल, तर ठाण्यात बहुमत असूनही भाजपाला सत्तेत भागीदार करून घ्यावे लागेल का? मुंबईतील मागणी सोडून ठाण्यात पूर्ण सत्ता राखायची का? की दोन्ही ठिकाणी संतुलन साधून युती टिकवायची? हे निर्णय घेणे शिंदे गटासाठी सोपे नाही. एकीकडे पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे महायुतीतील संबंध तुटू नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
फडणवीसांच्या परतीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे असून लवकरच ते परत येणार आहेत. त्यांच्या परतीनंतर या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तावाटपाबाबत उच्चस्तरीय चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई आणि ठाण्यातील ही महापौरपदाची रस्सीखेच महायुतीच्या अंतर्गत समीकरणांना नवे वळण देणारी ठरू शकते. आता पाहावे लागेल की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही ठिकाणी सत्ता आणि सौहार्द यांचे संतुलन कसे साधतात.





