निवडणुक विश्लेषण: भाजपचे नंबर एक…दोन आणि तीन

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गुजरात विधानसभेसाठी पुढच्या पंधरवड्यात मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांत म्हटले तर काहीच साम्य नाही. म्हटले तर बऱ्यापैकी साम्य. भौगोलिक विचार करता आणि लोकसंख्येचा विचार करता तेथे कोणतेच साम्य नाही. तथापि तीन गोष्टी साम्य दर्शवणारा आहेत.
यातील पहिले येथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. दुसरे या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाटी कोरी आहे. अर्थात, त्यांच्या राज्यात आणि राज्याबाहेर मुख्यमंत्री कोणाला फारसे परिचित नाही आणि तिसरे आणि सगळ्यांत महत्त्वाचे साम्य म्हणजे या दोन्ही राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर मते मागण्यात आली किंवा मागितली जात आहेत व ती मिळणारही मोदी यांच्याच नावावर.
केवळ मोदी एकटे देशाचे संपूर्ण मंत्रिमंडळ चालवत आहेत असे चित्र गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने जाणवते. अर्थात, त्या त्या मंत्रालयाचे मंत्री कारभार पाहात आहेत. मात्र, नितीन गडकरींचा अपवाद सोडला तर मंत्रिमंडळावर आणि पक्षसंघटनेवर मोदी यांचीच चौफेर पकड आहे. इतकेच नाही तर ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्या त्या राज्यांच्या मंत्रिमंडळावरही मोदी यांचीच पकड आहे. त्यांची खपामर्जी झाली तर संबंधित राज्यात उलथापालथ होऊ शकते याची संबंधित मंत्र्यांना कल्पना आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीत मोदीच पहिल्या नंबरवर आहे व हा काही नवीन शोध नाही.
सरकार ते चालवत आहेत. मात्र, पक्ष संघटनेवर पकड असण्याच्या कामात त्यांना सगळ्यांत जास्त मदत जर कोणाची होत आहे ती अमित शहा यांची. हेही आता सर्वश्रुत आहे अन् या दोन नेत्यांच्या मर्जीतले व पक्ष आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे जे. पी. नड्डा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपात याच क्रमाने ताकदीचा समतोल साधला गेला आहे, असे मानले जात होते व ते खरेही होते. मात्र, आता याच नेत्यांकडून कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे आता त्याची थेट वाच्यता केली जाऊ लागली आहे हे विशेष.
त्याकरता आता हिमाचल प्रदेशचे उदाहरण दिले जाते. मुख्यमंत्री ठाकूर प्रचारात होते व पक्षाच्या पोस्टरवरही झळकले. नेत्यांच्या भाषणांतही त्यांचा उल्लेख होता. मात्र, मतदारांनी मते कोणाला द्यायची आहे हे मोदींनीच जाहीरपणे सांगितले. ते म्हणाले होते की तुमचा उमेदवार कोण आहे ते लक्षात ठेवण्याची गरज नाही.
कमळाचे फूल दिसले की लक्षात घ्यायचे की हा भाजप आहे. हे मोदी आहेत व ते आपल्याकडे आले आहेत. कमळाच्या फुलाला दिलेले तुमचे प्रत्येक मत आशीर्वाद म्हणून माझ्या खात्यावर जमा होईल. थोडक्यात, दिल्लीत मी तुमच्यासाठी बसलो आहे व राज्यात तुम्ही मलाच मत देत आहात हेच मोदी यांनी पद्धतशीरपणे आणि जाहीरपणे मतदारांना सांगितले.
दुसरे उदाहरण गुजरातचे दिले जाते. अमित शहा केंद्रात गृहमंत्री झाल्यानंतर ते गुजरातच्या राजकारणात सहभागी असूनही काहीसे अलिप्त झाले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या गुजरात वाऱ्या वाढल्यानंतर तोपर्यंत निर्धास्त असणाऱ्या भाजपने अर्थात मोदींनी पुन्हा शहांकडे पाहिले. सगळ्याच जुन्या नेत्यांना आणि मंत्र्यांना शहांनी सन्मानाने घरी बसवले आणि मंत्रिमंडळाला संपूर्ण नवा चेहरा दिला.
आमदारकीची पहिली टर्म आणि फारतर दुसरी टर्म असणारे भाजपचे नेते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. ऑक्टोबर महिन्यापासून शहा गुजरातमध्येच व्यस्त आहेत. ते फारशा मुलाखतीत देत फिरत नाहीत. त्यामुळे प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेस आणि आपच्या नेत्यांप्रमाणे शहांचा गाजावाजा झाला नाही व त्यांनी स्वत:ही तसा तो केला नाही. शहा यांनी प्रचार यंत्रणेवर पूर्ण पकड बसवली आहे. त्यांच्या कथित मायक्रो मॅनेजमेंटची चर्चा होतच असते.
आताही त्यांनी गुजरातचे प्रदेश, जिल्हा, गाव आणि बूथ स्तरावरच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या आहेत. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नाराजीचा फॅक्टर लक्षात घेतच त्यांनी गेल्या काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्व सन्माननीय मंत्र्यांना बाजूला करत संपूर्ण फ्रेश चेहरे देण्याचा त्यांनी निवडणुकीत प्रयत्न केला आहे.
थोडक्यात, एका पंधरवड्यात राज्याचा मुख्यमंत्रीही आपण सामान्य आमदार करू शकतो व सामान्य आमदारालाही मुख्यमंत्री करू शकतो हे त्यांनी न बोलता दाखवले आहे. नड्डा यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या दोन नेत्यांच्या विश्वासातले आहेत. पक्षात सगळ्यांना एका रांगेत उभे करण्याचे काम ते इमानेइतबारे करत आहेत. त्या रांगले दिशा मोदी तर ऊर्जा शहा यांचीच आहे.





