BJP NCP Alliance : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीचे संकेत; गटनेते प्रशांत शितोळेंनी स्पष्ट केली भूमिका
BJP NCP Alliance : राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत वाटा देण्याबाबत भाजप सकारात्मक; प्रशांत शितोळेंनी व्यक्त केली पक्षाची भूमिका.

BJP NCP Alliance – महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. हा धोरणात्मक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे. त्यासाठी पक्षातील प्रमुख विचार करतील. मात्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेण्यास इच्छुक आहोत असा दावा भाजपचे नवनिर्वाचित गटनेते प्रशांत शितोळे यांनी सोमवारी (दि. २) केला.
महापौर व उमपहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.शितोळे म्हणाले, निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार स्वतःच्या प्रभागातील विकासाविषयी भरभरून बोलत होता.
दिवंगत अजितदादा यांनी देखील या शहराच्या विकासाठी काम केले आहे. विकासाच्या बाजूने सातत्याने उभे राहण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने देखील उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांना सत्तेत घेण्याबाबत आम्ही इच्छुक असलो तरी याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल.
महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसेच यापुढील पदांच्या निवडीनंतर कोणताही जल्लोष न करण्याची भूमिका आमची आहे. खेड्यापाड्यापासून ते मेट्रो सिटीपर्यंतच्या घरा-घरामध्ये आज दुखाचे सावट आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होत असताना पक्षाच्या वतीने कोणताही जल्लोष करण्यात येणार नसल्याचे शितोळे यांनी स्पष्ट केले.
आमदारांची पाठ
दरम्यान, महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेल्या ठिकाणाच्या बाहेरून काढता पाय घेतला. तर आमदार शंकर जगताप तिथे येऊनही पत्रकार परिषदेस न थांबता निघून गेले.





