कामगारांच्या हक्कासाठी भाजप आमदाराचा रौद्रावतार; अधिकाऱ्यावर उगारली पाण्याची बाटली; काय आहे प्रकरण?

अमरावती : केंद्र सरकारच्या एनटीसीमार्फत महाराष्ट्रात मुंबईसह सोलापुरातील बार्शी आणि अमरावती येथील अचलपूरच्या फिनले मिलसह राज्यातील अनेक गिरण्या लॉकडाऊननंतर बंद असून, कामगारांचे पगार व देणी थकित आहेत. याच पार्श्वभूमीवर फिनले मिलच्या कामगारांनी आंदोलन छेडलं.
दोन कामगार चिमणीवर ठिय्या देत असताना, शेकडो कामगारांनी गेटसमोर निदर्शने केली. या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी प्रशासनाशी बैठक घेतली. चर्चा दरम्यान आमदार तायडे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी टेबलावरची पाण्याची बाटली उचलून अधिकाऱ्यावर फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
तणावपूर्ण चर्चेनंतर मिल प्रशासनाने दोन महिन्यांत सर्व थकित वेतन आणि मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिलं. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. चिमणीवर आंदोलन करणाऱ्या दोन कामगारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करण्याची कामगारांची मागणी अजूनही प्रलंबित आहे.
दरम्यान, फिनले मिल ही वस्त्रोद्योग महामंडळाअंतर्गत चालवला जाणार उद्याोग आहे. मात्र, देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून या मंडळाच्या सर्वच गिरण्या बंद असून मिल सुरू करण्याची मागणी कामगार सातत्याने करत आहेत. मात्र, गेल्या 5 वर्षांपासून मिलचा भोंगा बंदच आहे.





