करोनाचा नायनाट करण्यासाठी भाजप आमदाराचे होमहवन

बेळगाव – करोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये आणखी एका भाजप आमदाराने होमहवन सुरू केले आहे. अभय पाटील असे त्यांचे नाव असून त्यांनी होमहवन केल्याची बातमी काही वाहिन्यांनी दिली.
पर्यावरणाला विषाणूमुक्त करण्यासाठी त्यांनी हा यज्ञ केला. दरम्यान, एवढेच नव्हे तर त्यांनी बेळगाव शहरातील गल्ल्यांमध्ये हा होम पेटलेला गाडादेखील फिरवला. अभय पाटील बेळगाव दक्षिणचे भाजपा आमदार आहेत.
वातावरणाच्या कथित शुध्दीकरणासाठी एक विशेष गाडी तयार करण्यात आली असून, विशेष कुंड देखील तयार करण्यात आलेत. होम हवन करण्याच्या उपक्रमाला अभय पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर भागातील होसुरमध्ये प्रारंभ करण्यात आला.
होम करण्यासाठी कडूनिंबाचा पाला, तूप, तांदूळ, कवडी उद, गुगुळ, शेणकुटे, कापूर यांचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक भागातील युवक मंडळे आणि महिला मंडळांनी पुढाकार घेऊन होम हवन करून वातावरण शुद्धीकरण करण्याचा उपक्रम यशस्वी करावा.
पूर्वी घरोघरी उद घालण्याची पद्धत होती; पण अलीकडे ती बंद पडली आहे. तरी जनतेने पूर्वीप्रमाणे आपल्या घरात उद घालण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी. यामुळे प्रदूषित वातावरणाचे शुद्धीकरण होण्यास मदत होईल असे सांगितले जाते आहे.





