सातारा : सुवर्णाताई पाटील यांना स्वगृही बोलवणे म्हणजे भाजपच्या नेत्यांना आमच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे का? तसे त्यांनी गृहीत धरले आहे का? त्यांना महाविकास आघाडीने न्याय दिला आहे. तुम्हाला निष्ठावान उमेदवाराची काळजी असती तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. आमच्या उमेदवाराची काळजी करायचे सोडून द्या, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. महाविकास आघाडी साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. सातारा शहरासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भाने महाविकास आघाडीची काय तयारी आहे. या दृष्टीने शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक रणनीतींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले भाजपच्या नेत्यांनी आमच्या उमेदवाराची काळजी करणे सोडावे. सुवर्णाताई पाटील यांनी कोणतीही अपेक्षा न करता साताऱ्यासाठी काम करणे हे महत्त्वाचे आहे. ही भूमिका बोलून दाखवली आहे. त्यांची कामाविषयीची आत्मीयता तसेच सातारा शहरातील विकासाच्या संदर्भाने केलेली मांडणी. या दृष्टीने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांची नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सुवर्णाताई पाटील यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते, यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले भाजपच्या नेत्यांना त्या स्वगृही याव्यात असे वाटते, म्हणजे त्यांचा विजय पक्का आहे, असे त्यांनी गृहीत धरले आहे काय? महाविकास आघाडीने त्यांच्या निष्ठेला पुरेपूर न्याय दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या निष्ठावान उमेदवारांची काळजी होती तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवले असते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. म्हणूनच अनेक निष्ठावंत भाजपच्या नेतृत्वापासून दूर सरकले आहेत, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. साताऱ्यातील अनेक समस्यांविषयी अनेक लोक बोलत असून अनेक धडाडीचे उमेदवार समोर आले होते. काहींनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती. साताऱ्यात प्रस्थापितांची दहशत आहे, असे नाही त्यांच्या संदर्भातही बोलणारी अनेक लोक आहेत. मात्र लोकशाहीची ही निवडणूक ही समोरासमोर आणि अटीतटीची झाली पाहिजे, असंही शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण कानाकोपऱ्यामध्ये आजही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे नेटवर्क आहे. वयोमानामुळे काही गोष्टीला मर्यादा आहेत. तरीसुद्धा आजही तरुणांना लाजवेल अशा राजकीय उत्साहाने ते वावरत असतात. बिहारच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एमआयएम, प्रशांत किशोर दुभंगलेली वोट बँक हे जे प्रकार झाले ते भाजपने विरोधकांना खिळखिळे करण्याच्या दृष्टीने केली होती. महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची आम्ही पुरेशा अवधीत योग्य ती तयारी करून महायुतीला जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न करू. कारण नगरपालिका निवडणुकांना अत्यंत कमी वेळ मिळाल्यामुळे संघटनात्मक बांधणी आणि वातावरण निर्मिती यामध्ये राजकीय कसरत होत आहे, अशी प्रांजळ कबुली शशिकांत शिंदे यांनी दिली.