मुंडे प्रकरणावरून भाजप नेत्याकडून उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या ‘त्या’ निर्णयाची आठवण; म्हणाले…

मुंबई – धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप गंभीर असल्याचं म्हंटलं होत. शरद पवारांच्या याच वक्तव्याचा आधार घेत आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माझी एकत्रित भूमिका असल्याचंही ते म्हणाले.
…तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले होते
यावेळी बोलताना दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘ जेव्हा जेव्हा राज्यात अशा घटना घडल्या किंवा प्रसंग आले त्या त्या वेळी संबंधीत मंत्र्याकडून राजीनामा घेतल्याची अनेक उदाहरण आहेत. शिवशाही सरकार असतानाही काही मंत्र्यांवर आरोप झाले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले होते. म्हणून त्याचं बाळासाहेबांचे सुपुत्र जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे कारण आता शरद पवारांचीही भूमिका स्पष्ट झाली आहे,’
शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर भाष्य
याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, “धनंजय मुंडे प्रकरणी राष्ट्रवादीची पहिली भूमिका चाचपडणारी होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती मांडली होती. परंतू आता शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर हे प्रकरण गंभीर असेल आणि संबंधित महिलेनं मोठे आरोप केले आहेत तर त्याची सिद्धता होईलच. राजकारणात शेवटी नितीमुल्य आणि नैतिकतेला फार महत्व आहे.”
…तर मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्या
धनंजंय मुंडे यांनी या प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, जर चौकशीत ते निर्देष असतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समावून घेतलं जाऊ शकतं, हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझं एकत्रित मत आहे, भाजपाच्या भूमिकाबाबत असं स्पष्टीकरणंही यावेळी दरेकर यांनी दिलं.





