बीड : बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा खटला सुरू झाला असतानाच आता पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भाजप पदाधिकाऱ्याचा धारदार हत्याराने दिवसाढवळ्या खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना माजलगाव शहरातील भाजप कार्यालयासमोर दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. बाबासाहेब प्रभाकर आगे (वय -३०) असं हत्या करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नारायण शंकर फपाळ (वय-३५, रा. बेलुरा) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका सरचिटणीस आणि बीड जिल्हा विस्तारक होते. आगे हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे त्यांना निमंत्रण होते. त्यावेळी ते दिल्लीला देखील गेले होते. दरम्यान, भाजप कार्यालयात दुपारी आगे बसले होते. त्यावेळी नारायण फपाळ सुद्धा एक तास बसून होता. सर्वजण बाहेर येताच संधी साधत फपाळने आगे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. अनैतिक संबंधातून खून हल्ला करताना फपाळ याने एवढे रौद्ररूप धारण केले की, आगे याच्यावर वार करताना कोणीही मध्यस्थी करण्याची हिंमत केली नाही. अनेकजण हत्येच्या घटनेचा व्हिडीओ काढण्यात मग्न होते. अचानक झालेल्या हल्ल्यात आगे रक्तबंबाळ होऊन कोसळले व गतप्राण झाले. आगेंची हत्या करून नारायण स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या पत्नीशी बाबासाहेबचे अनैतिक संबंध होते, त्यास सांगूनही तो ऐकत नसल्याने आपण हत्या केल्याचे आरोपी नारायणने पोलिसांना सांगितले.