“भाजप चुकीच्या लोकांशी पंगा घेतोय”

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क प्रकरणात आम आदमी पक्षाचे सरकार आणि हैदराबाद येथील मद्य विक्रेते यांच्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांनी मध्यस्थ म्हणून काम केले असा आरोप भारतीय जनता पार्टीने केल्यामुळे कविता भडकल्या आहेत. हे आरोप निराधार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
माझ्या आणि पक्षाविरोधात केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांच्याकडे सगळ्या तपास संस्था आहेत. त्यांनी याचा तपास करावा. आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू असे कविता म्हणाल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सातत्याने भाजप सरकारच्या विरोधात प्रखर टीका करत आहेत. त्यामुळे भाजप बिथरला आहे. त्यामुळे ते आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते चुकीच्या लोकांशी पंगा घेत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.
आपल्यावर आरोप करणारे दिल्ली भाजपचे नेते परवेश वर्मा आणि मनजिंदरसिंह सिरसा यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीतील नव्या मद्य धोरणानुसार कमिशन वाढवून मिळण्यासाठी म्हणजे 2.5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यासाठी सिसोदिया यांना कोट्यवधी रूपयांची लाच दिली गेल्याचा आरोप भाजपने केला आहे.
केवळ इतकेच नाही तर त्यांना तब्बल 150 कोटी रूपये दिले गेल्याचाही भाजपचा आरोप आहे. सिसोदिया यांनी तेलंगणातील नेत्यांसमवेत बैठका घेतल्या होत्या. त्यांनी के. कविता यांची भेट घेतली नव्हती का, हे स्पष्ट करावे अशी मागणीही भाजपने केली आहे.





