ओबीसी आरक्षणाला झुलवत ठेवण्याचे पाप भाजप करत आहे – अमोल मिटकरी

मुंबई – आज (शुक्रवार, दि.4) ओबीसी आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष सामंजस्याने एकत्र येऊन दोन्ही सभागृहात चर्चा करतील असं आम्हाला वाटत होतं. मात्र भाजपला ती चर्चा घडवून आणायची नव्हती. ज्या पक्षाचे पंतप्रधान सुद्दा ओबीसी आहेत तो पक्ष स्वत: ओबीसींना का न्याय देऊ शकत नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणाला झुलवत ठेवण्याचं पाप भाजप करत असून हा खेळखंडोबा थांबवून ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्याकरता त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
आज विधानसभेत छगन भुजबळ व विधान परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, मागील सरकारने हे आरक्षण का लांबवले यावर चर्चा करण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घ्यावी. ओबीसी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपने राजकारण करु नये. ज्या इम्पिरिकल डाटाची मागणी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून आहे तो इम्पिरिकल डाटा केंद्र सरकार का देत नाही, असा थेट सवाल मिटकरी यांनी केला.
भाजपप्रणित राज्यपालांना ओबीसी आरक्षणाचा खेळ करायचा आहे असे दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा सभागृहाची दिशाभूल करत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना, केंद्रातही तुमचं सरकार असताना ओबीसी आरक्षणाचा पाठपुरावा करून तुम्ही इम्पिरिकल डाटा का प्राप्त करु शकला नाहीत, असे त्यांनी फडणवीस यांना विचारले.





