Vaibhav Khedekar : मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांना भाजपकडून डबल रिटर्न गिफ्ट, पत्नीलाही मोठी संधी?

Ratnagiri News : तळकोकणातील खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेतून हकालपट्टी केलेले नेते वैभव खेडेकर यांनी अखेर 14 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तीनदा रखडलेला त्यांचा पक्षप्रवेश अखेर मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशानंतर भाजपने खेडेकरांना दिवाळीचे डबल रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा तळकोकणात रंगली आहे.
मनसेने खेडेकर यांच्यासह तिघांना भाजप नेत्यांशी जवळीक आणि उठबस केल्याच्या कारणावरून पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर खेडेकरांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, पण दोनदा त्यांचा पक्षप्रवेश रखडला. अखेर मुंबईत भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चित झाला.
आता भाजपकडून खेडेकर यांना महामंडळावर नियुक्तीचा शब्द मिळाल्याची चर्चा आहे. शिवाय, खेड नगरपरिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदासाठी खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे खेडेकर यांचा भाजप प्रवेश त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरल्याचे दिसते.
पक्षप्रवेशाची रद्द झालेली हॅटट्रिक
खेडेकर यांचा पक्षप्रवेश यापूर्वी दोनदा रद्द झाला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. तरीही, खेडेकरांनी मुंबईत जाऊन भाजप नेत्यांशी संपर्क साधत अखेर प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला. आता त्यांच्या या प्रवेशाने तळकोकणातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.





