मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप पक्षाकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र भाजपकडून किरीट सोमय्या यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमय्या यांच्यावर मुंबई एमएमआर भागातील मतदार एकत्रिकरण अभियानाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेलमधील मतदारांच्या एकत्रिकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत किरीट सोमय्या यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक समितीत न विचारता सहभागी केल्याने सोमय्या यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत.