nagar | भाजपने सत्तेचा उपयोग शेतकऱ्यांसाठी केला नाही

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- भाजपाने सत्तेचा उपयोग शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी न करता पैसे कमवण्यासाठी केला. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भवितव्याची असून देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव, कमालपूर, खानापूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, हरेगाव, उंदिरगाव व ब्राह्मणगाव वेताळ या गावात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आ. कानडे बोलत होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक कानडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक थोरे, संजय छल्लारे, तालुकाप्रमुख लखन जाधव, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब उंडे, अॅड राजेश बोर्डे, गोरख धनवटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार आदींसह आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांविरोधी केलेल्या तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केले. त्यात ९०० हून अधिक शेतकरी हुतात्मा झाले. त्यानंतर हा कायदा मागे घेण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली. महाविकास आघाडीला किमान ३५ जागा मिळतील, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण मंजूर केलेल्या रस्त्यांना राज्य सरकारने बंदी घातली. आम्ही न्यायालयीन लढा लढलो. न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने बंदी उठवली. त्यानंतर आम्ही उद्घाटने केलेल्या या रस्त्यांचे विरोधकांनी पुन्हा उद्घाटन करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्यांना तेथेच फटकारले सांगितले.





