Delhi Election 2024 : “आपच्या मतदारांची नावे भाजप हटवत आहे”; अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

Delhi Election 2024 – दिल्लीत भाजप छुप्या पद्धतीने मते कापत आहे. शाहदरा विधानसभेत गेल्या एका महिन्यात भाजपने 11 हजार 18 नावे कमी करण्याचा अर्ज दिला आहे. हा क्रम सुरूच आहे. ते 1000-500 मते कमी करण्यासाठी अर्ज देत आहेत. अशा प्रकारे होत असलेल्या कारवाईप्रकरणी निवडणूक आयोगाने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केजरीवाल म्हणाले की, भाजपने आपल्या लेटरहेडवर मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज केला आहे. गेल्या दीड महिन्यांत त्यांनी 11,000 लोकांची नावे रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये असे म्हटले आहे की हे 11,018 लोक एकतर कुठेतरी गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही 500 नोंदी तपासल्या. या ५०० पैकी ३७२ लोक तिथे त्यांच्या पत्त्यावरच राहत असल्याचे दिसले.
म्हणजे त्यांची यादी 75% चुकीची आहे. आम्हाला कळले की यातील बहुतांश मतदार हे आपचे मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघातून ६% मते गमावली तर निवडणूक घेण्याचा अर्थ काय? सुमारे 1 लाख 86 हजार मते आहेत, त्यापैकी सुमारे 11 हजार मते वजा करण्यासाठी भाजपने अर्ज केला आहे. अजून किती अर्ज येतील माहीत नाही.
यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे माजी मुख्यमंत्री म्हणाले. नावे काढण्यासाठी अर्ज प्राप्त झालेल्यांची यादी आयोगाच्या वेबसाइटवर टाकावी लागेल. पण, तिथे काहीच नाही. केवळ 487 अर्ज दिसत असून, त्यात मतदारांना काढण्याचे थोडेसेच अर्ज आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वीच त्यावर कारवाई केली आहे.
भाजपच्या अर्जावर निवडणूक आयोग गुप्तपणे काम करत आहे. 14 व्या विधानसभेत जनकपुरी विधानसभेतून सुमारे 6 हजार मतदारांना काढून टाकण्यासाठी भाजपकडून अर्ज आला आहे. संगम विहारमध्ये पाच हजार, आरके पुरममध्ये सुमारे चार हजार अर्ज आले आहेत. हे सगळे संशयास्पद असल्याचे केजरीवाल म्हणाले.





