सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये एका नगरपरिषदेसाठी 25 कोटी या हिशेबाने एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी भाजपने 300 कोटी रुपये आणले आहेत. त्यामुळे भाजप हाच सर्वात मोठा भ्र्ष्ट पक्ष आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसमधील आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. जानकरांच्या या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे . स्थानिकच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून नेते मंडळींच्या समावेशाने प्रचाराला वेग मिळाला आहे. लक्ष्मीदर्शनाच्या चर्चांनी देखील वेग पकडला आहे. एका मताला हजार, काही ठिकाणी २ हजार असे रेट देखील ठरले असल्याची चर्चा आहे. त्यातच आमदार उत्तम जाणकरांनी थेट आकड्यासह आरोप केल्याने मात्र सोलापूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. माध्यमांशी बोलताना आमदार जानकर म्हणाले की, मी 30 वर्षे भारतीय जनता पक्षात होतो. त्यावेळी राष्ट्रप्रथम हे आमचे ब्रीदवाक्य होते. मात्र आता भ्र्ष्ट प्रथम व मुस्लीम खतम हे नवीन ब्रीदवाक्य भाजपने घेतले असल्याचा टोला जानकरांनी यावेळी लगावला. ते पुढे म्हणाले की, पूर्वी अटलजींची भाजप होती, त्यामध्ये आता केवळ भ्र्ष्ट लोक दिसून येत असल्याने पक्षाची गटारगंगा झाली आहे. पूर्वीची तत्त्वे राहिली नसून आता केवळ ते भ्रष्टाचाराच्या एका मुद्द्यावर सर्वजण एकत्र येत आहेत. सध्याचे सरकार फार टिकणारे नाही आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, पालकमंत्री म्हणत आहेत, भाजप जिथे चौथ्या क्रमांकावर आहे, तिथे कुणाकडूनही पैसे घ्या, मात्र मतदान आम्हालाच करा, अशी भाषा पालकमंत्री वापरत आसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार असून ते फार काळ टिकणार नाही. यातून लवकरच मोठा स्फोट होणार असल्याचे भाकित देखील जानकरांनी यावेळी केले.