‘अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झालाय’, उत्तम जानकरांनी EVM चे गणित मांडत थेट आकडेवारीच दिली

Uttam Jankar on EVM: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यापासून सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे याबाबत सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. आता जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे 20 हजार मतांनी पराभूत झाले असल्याचे आणि महायुतीचे केवळ 107 आमदार निवडून आले असल्याचा दावा केला आहे.
निवडणुका पार पाडल्यापासून आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करत आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी केली होती. मात्र, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर ही प्रक्रिया पार पडली नाही. आता पुन्हा एकदा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालात गडबड असल्याचे म्हणत आकडेवारीच मांडली आहे.
आमदार उत्तम जानकर म्हणाले की, पूर्ण चौकशी केल्यास बारामती मतदारसंघात अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झाल्याचे दिसून येईल. या मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी 1 लाख 80 हजार मिळाली आहेत. त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत 80 हजार अधिक 60 हजार अशी 1 लाख 40 हजार आहेत. त्यातील 60000 मते वजा होतात, त्यानंतर 1 लाख 20 मते अजित पवारांना राहतात.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे केवळ 12 आमदारच निवडून आले आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे 12, एकनाथ शिंदे यांचे 18 आणि भाजपचे 77 असे महायुतीचे एकूण 107 आमदारच निवडून आले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, 150 मतदार संघात गडबड असल्याचेही ते म्हणाले. या गडबडीची माहिती राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोगालाही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.





