Ramdas Athawale : बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणतात “भारतात आधी सगळे…”
Ramdas Athawale : अडीच हजार वर्षांपूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे समाजघटक अस्तित्वात होते. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये कुर्बानीवरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदा भाजपकडून सार्वजनिक ठिकाणी बकऱ्यांची कुर्बानी देण्यास तीव्र विरोध करण्यात आला आहे. त्यानंतर मिरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेले बकरे अन्य ठिकाणी हलवण्याची वेळ प्रशासनावर आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे प्रमुख रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडत भाजपलाच अप्रत्यक्ष टोला लगावला. पालघर येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सर्व धर्मांच्या भावना जपण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : oni Kalbhor Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
रामदास आठवले म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माला समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना भडकतील असे वक्तव्य किंवा कृती टाळली पाहिजे. “मुघल भारतात आल्यानंतर काही हिंदू मुस्लीम झाले. त्यामुळे भारतातील मुस्लीम हे औरंगजेबाची अवलाद नसून आपलेच बांधव आहेत. भारतात आधी सगळे हिंदूच होते. अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक होते. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, “कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचता कामा नये. मग विरोध करणारे भाजपचे असोत किंवा इतर कोणतेही. भारतीय संविधानाला धक्का लागेल असे कोणतेही कृत्य होऊ नये. संविधान हे सर्वांसाठी समान आहे.”
नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
दरम्यान, मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर-1 कॉम्प्लेक्समध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी पूनम इस्टेट क्लस्टर-3 परिसरातील पाच ते सात बकऱ्या पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी हलवण्यात आल्या.
बकरी ईदच्या दिवशी कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी मिरा-भाईंदर शहरात पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. शहरभर सुमारे ५२५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांनी शांतता आणि सौहार्द राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आला आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं जारी केले आहेत.
प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आज गुरुवारी २८ मे दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






