Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. कलाकारांनंतर आता राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्याला या टोळीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर दावा केला आहे. १० कोटींची खंडणीची मागणी आमदार पठाण यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १७ फेब्रुवारी रोजी जेवत असताना त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले आणि “१० कोटी रुपये दिले नाहीत तर जीवे मारू” अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. “आज नाहीतर उद्या जिथे दिसाल तिथे गोळ्या घालू,” असेही धमकीत म्हटल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी उद्योगपती नाही, लोकप्रतिनिधी आहे’ पठाण म्हणाले, “मी फक्त एक आमदार आहे, उद्योगपती किंवा करोडपती नाही. लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलो आहे. तरीही मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात आहेत.” त्यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. पोलिसांत तक्रार, सुरक्षा वाढवली या प्रकरणी अकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून १७ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पठाण यांनी दिली. अकोला पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, धमकीमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.