Pune Crime News: पुण्यात बिश्नोई टोळीचा पुन्हा धुमाकूळ; खंडणीच्या धमकीनंतर उद्योगावर गोळीबार
Pune Crime News : बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपी शुभम लोणकरच्या गटावर संशय; पुण्यातूनच टोळीचे नेटवर्क चालविण्याची शक्यता

Pune Crime News: पुण्यात पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीचे कनेक्शन समोर आले असून, खंडणीसाठी धमकी देत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्योगावर थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर याच्या गटाचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वानवडी पोलीस ठाण्यात अमोल राजेंद्र चमडाई यांनी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास खंडणीबाबत तक्रार दिली.
त्यांना पुढील कारवाईसाठी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. फिर्यादीला दुपारी साडेचारच्या सुमारास स्वतःला ‘अर्जुन बिश्नोई’ म्हणवणाऱ्या व्यक्तीचा फोन आला होता. या कॉलमध्ये मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आली होती.
दरम्यान, फिर्यादी पोलीस ठाण्यात असतानाच रात्री ८.१० वाजता त्यांच्या एच. व्ही. विकास पाइप्स अँड स्टील प्रा. लि. या आस्थापनावर चार राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेसह वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत.
शुभम लोणकरच्या गटाचा संशय
तपासात संशयाची सुई शुभम लोणकर याच्याकडे वळली आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी असून, यापूर्वी अकोला पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून पाच पिस्तुले जप्त केली होती. त्याने वारजे परिसरातील काही तरुणांचा वापर करून टोळीचे जाळे उभे केल्याची माहिती तपासातून समोर आली होती.
लोणकर हा अभिनेता सलमान खान याला धमकी देण्याच्या प्रकरणातही आरोपी आहे. सैन्य भरतीसाठी राजस्थानला गेल्यानंतर त्याचा बिश्नोई टोळीशी संपर्क आला आणि त्यानंतर त्याने पुण्यात टोळीचे नेटवर्क उभे केल्याचे तपास यंत्रणांना वाटत आहे. प्राथमिक माहितीनुसार तो सध्या कॅनडात फरार असल्याची शक्यता आहे.
यापूर्वी पीसीएमसीमधील फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबारात देखील बिश्नोई टोळीचे कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर आता थेट खंडणीसाठी धमकी आणि उद्योगावर गोळीबार झाल्याने पुणे ग्रामीण आणि शहर परिसरात बिश्नोई टोळीची वाढती घुसखोरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
हेही वाचा:





