Happy Birthday Yashasvi Jaiswal : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आज 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. या युवा फलंदाजाने भारतीय आंतराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जयस्वालने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या डावखुऱ्या सलामीवीराने 171 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने भारताचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवागच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली.
आशियाबाहेर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी हा पराक्रम वीरेंद्र सेहवागने पहिल्यांदा केला होता. 2001 मध्ये सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने 105 धावांची खेळी केली. यानंतर जैस्वाल आशियाबाहेर कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
यशस्वी भारताकडून कसोटी आणि टी-20 क्रिकेट खेळतो. जैस्वालने भारतासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत जैस्वालही टीम इंडियाचा एक भाग आहे. जैस्वाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. आयपीएल 2023 मध्ये त्याने राजस्थानसाठी अप्रतिम कामगिरी केली होती.
आतापर्यंतचे करिअर…
जैस्वालने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 2 कसोटी आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 3 डावात त्याने 88.66 च्या सरासरीने 266 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटमधून 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. जैस्वालची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 171 धावा आहे, जी त्याने पदार्पणाच्या डावातच केली.
याशिवाय, T20 आंतरराष्ट्रीय 15 सामन्यांच्या 14 डावांमध्ये त्याने 33.07 च्या सरासरीने आणि 159.25 च्या स्ट्राइक रेटने 430 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. T20I मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 100 धावा आहे.
आयपीएलमध्ये यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्सने 2020 मध्ये जैस्वाल याला 204 कोटींमध्ये खरेदी केले. त्याच वर्षी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 37 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 32.56 च्या सरासरीने आणि 148.73 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 172 धावा केल्या आहेत.
यशस्वी जैस्वालचा परिचय…
दरम्यान, यशस्वी जैस्वाल याचा जन्म 28 डिसेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील सुरियावान गावात झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. यशस्वीचे वडील भूपेंद्र जैस्वाल भदोहीमध्ये हार्डवेअरचे छोटे दुकान चालवत होते. त्यांची आई कांचन जयस्वाल गृहिणी आहे. यशस्वी त्याच्या सहा भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या 11 व्या वर्षी, भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वी एकटाच मुंबईला गेला, जिथे त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. पण आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने त्याने क्रिकेट शिकले आणि आपले स्वप्न पूर्ण केले.
जैस्वाल अत्यंत कठीण परिस्थितीतून उभा राहिला आहे. तो यूपीतील भदोही येथून आला आणि नंतर मुंबईला शिफ्ट झाला. येथे तंबूत राहून त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. नंतर तो भारतासाठी अंडर 19 विश्वचषक खेळला आणि आता वरिष्ठ संघाचा भाग आहे.