Birthday Special : सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आज १ ऑगस्ट रोजी तापसीचा वाढदिवस आहे. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री तापसी पन्नूने आता बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेमध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावरील स्पष्ट भूमिका आणि एक अनोखा अंदाज यांमुळे तापसीने इतरांपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध केले आहे.
तापसी म्हणते मी आयुष्यात बराच संघर्ष पाहिला आहे. त्यामुळेच मला चालून आलेला एकही चित्रपट सोडावासा वाटत नाही. सर्व धाटणीचे चित्रपट मला करायचे आहेत, असे ती सांगते. भलेही त्या चित्रपटात माझी भूमिका दहा मिनिटांची असो वा दोन तासांची मी माझ्या वाट्याला आलेले काम अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडते, असे तापसी सांगते.
विशेष म्हणजे लेडी अक्षयकुमार किंवा लेडी आयुष्मान खुराना यांसारख्या नावांनी तिला संबोधले जाते ही बाब तापसीला अत्यंत खुपते. ती म्हणते प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असते. त्यामुळे कोणाही दोन व्यक्तींमध्ये तुलना करणेच मला पटत नाही. तापसी म्हणते, लोकांनी पापी व्यक्तीपेक्षा पापाची घृणा केली पाहिजे.





