Ashok Saraf : थोडक्यात बचावले अशोक मामा.! सलमान खानच्या एका चुकीमुळे गेला असता अशोक सराफांचा जीव; मानेवर धरलेला खराखुरा चाकू अन्…
दृश्याचे शूटिंग सुरू झाले आणि कलाकार संवाद म्हणू लागले. त्याचवेळी सलमान खान त्यांच्या गळ्याला चाकू अधिक जोराने दाबत होता. चाकूचे टोक गळ्याला लागून जखम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Ashok Saraf : चित्रपटांमध्ये दिसणारे अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना थरारून सोडतात. पडद्यावर कलाकारांचा जीवघेणा संघर्ष, मारामारी आणि रक्तरंजित दृश्ये पाहताना प्रेक्षक अक्षरशः खिळून राहतात. मात्र, कॅमेऱ्यासमोर दिसणारा हा थरार प्रत्यक्षात शूट करताना कलाकारांना किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, याची कल्पनाही अनेकांना नसते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेला भीषण अपघात आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके ‘अशोक मामा’ म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांच्या आयुष्यातही घडला होता.
विशेष म्हणजे, एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सलमान खानने त्यांच्या गळ्याला लावलेला चाकू खरा होता. दृश्य सुरू असताना चाकूचा दाब वाढला आणि अशोक सराफ यांच्या गळ्याला खोल जखम झाली. शूटिंग संपल्यानंतर गळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले आणि हा प्रसंग किती भयानक ठरू शकला असता, याची जाणीव झाली. खुद्द अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत हा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला आहे.
नेमकं काय घडलं होतं? सलमानच्या हातातील चाकू ठरला जीवघेणा!
हा धक्कादायक प्रसंग १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जागृती’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला होता. या चित्रपटात सलमान खान आणि करिश्मा कपूर प्रमुख भूमिकेत होते, तर अशोक सराफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील एका दृश्यात सलमान खानला अशोक सराफ यांच्या गळ्याला चाकू लावायचा होता. मात्र, या दृश्यासाठी वापरण्यात आलेला चाकू खरा असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.
अशोक सराफ म्हणाले की, दृश्याचे शूटिंग सुरू झाले आणि कलाकार संवाद म्हणू लागले. त्याचवेळी सलमान खान त्यांच्या गळ्याला चाकू अधिक जोराने दाबत होता. चाकूचे टोक गळ्याला लागून जखम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सलमानला सावध करत चाकू हळू दाबण्यास सांगितले. ‘हळू दाब, इथे कट होत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपली अडचण सांगितली होती.
कॅमेऱ्यात दिसेल म्हणून चाकू उलटा पकडण्यास सलमानचा नकार!
चाकूचा दाब कमी करण्यासाठी अशोक सराफ यांनी सलमान खानला एक पर्यायही सुचवला होता. त्यांनी सलमानला चाकू उलटा पकडण्यास सांगितले. मात्र, समोर कॅमेरा असल्यामुळे चाकू पकडण्याची पद्धत बदलल्याचे दृश्यात स्पष्ट दिसेल, असे सलमानने सांगितले. त्यामुळे अखेर अशोक सराफ यांनी तो विषय सोडून देत सीन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
या प्रसंगाची आठवण सांगताना अशोक सराफ यांनी गळ्याजवळील नस कापली गेली असती, तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असती, असे सांगितले. ‘जर गळ्याची नस कापली गेली असती, तर तिथेच सगळं संपलं असतं. मी हा प्रसंग कधीच विसरणार नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे, या घटनेची आठवण सांगताना सलमान खानला हा प्रसंग आजही आठवत असेल की नाही, याबाबतही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. अशोक सराफ यांचा हा अनुभव ऐकल्यानंतर चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.







