विमानाला पक्षी धडकला… 150 प्रवासी थोडक्यात बचावले; नागपूर-दिल्ली एअर इंडिया विमान रद्द

नागपूर: नागपूरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे (Air India) विमान (फ्लाइट नंबर AI466) उड्डाणानंतर लगेचच पक्ष्याला धडकल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. या घटनेत जवळपास १५० प्रवासी थोडक्यात बचावले, कारण वैमानिकांनी त्वरित विमान नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने नागपूरहून दिल्लीसाठी टेकऑफ (Take-off) घेतले. परंतु, उड्डाणानंतर लगेचच विमानाला पक्ष्याची जोरदार धडक बसली. वैमानिकांच्या (Pilot) त्वरित आणि योग्य निर्णयामुळे विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द –
सुरक्षा प्रोटोकॉलनुसार (Security Protocol) विमानाची तपासणी करण्यात आली असता, पक्ष्याच्या धडकेमुळे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळून आले. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ लागणार असल्याने, अखेर कंपनीने ही फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून प्रवाशांना तात्काळ मदत पुरवण्यात आल्याचे आणि त्यांचे तिकीट भाडे परत करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
एक महिन्यात दुसरी घटना-
मागील महिन्याभरातील नागपूर विमानतळावर झालेली पक्षी धडकेची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी झालेल्या घटनेत एका विमानाचा ‘नोज कोन’ (Nose Cone) भाग खराब झाला होता आणि तपासणीदरम्यान रनवेवर एका ससाण्याचा मृतदेह आढळला होता. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाने पक्षी दूर जात असले तरी, रात्रीच्या वेळी घुबड (Owl) किंवा वटवाघूळ (Bat) यांच्या धडकेची शक्यता नाकारता येत नाही.





