आळंदीत वैद्यकीय कचरा उघड्यावर; नागरिकांच्या आरोग्यास धोका

आळंदी – शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयामार्फत वैद्यकीय कचरा खुलेआम घनकचरा संकलन करणाऱ्या गाडीत टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच वापरलेले इंजेक्शन रुग्णालय परिसरात इतरत्र पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांसह कचरा संकलन करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे.
वापरलेले इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, सुया, कापूस असा विविध प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा एकत्रितरित्या शहरातील घनकचरा घंटागाडीमध्ये दिला जात असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय उपचारातून निर्माण होणारा कचरा हा मानवी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे विविध संसर्गजन्य रोगांची लागण होऊ शकते. टीबी, त्वचा विकार, श्वसनसंस्थेसंदर्भातील आजार उद्भवू शकतात. लहान मुलांच्या हातात पडल्यास त्यांना अपाय होऊ शकतो. तसेच जनावरे, कोंबड्यांसारखे पक्षी कचऱ्याच्या संपर्कात आल्यास त्यांच्या पोटात कचरा गेल्यास अशावेळी संबंधित जनावरे, पक्ष्याचे मांस आणि जणावरांच्या दुधातूनही मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो.
“जैव वैद्यकीय कचरा व्यस्थापन नियमानुसार शहरातील रुग्णालय, आरोग्य निदान केंद्र, मेडिकल, प्रयोगशाळांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे निर्मात्यासाठी बंधनकारक आहे. त्या कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मान्यताप्राप्त प्रक्रिया केंद्राकडे देणे आवश्यक आहे. पालिकेच्या घनकचरा गाडीत जैववैद्यकीय कचरा टाकू नये. ग्रामीण रुग्णालय, आळंदी यांचे मार्फत मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा पालिकेच्या कचरा संकलन वाहनात टाकल्या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांना नोटीस बजावण्यात आली आहे. असा प्रकार भविष्यात कोणत्याही शासकीय, खाजगी रुग्णालयामार्फत झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल” – कैलास केंद्रे, मुख्याधिकारी आळंदी
आळंदी ग्रामीण रुग्णालय परिसरात वापरलेले इंजेक्शन उघड्यावर… pic.twitter.com/IVdwn95ech
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 18, 2023





